top of page

वसंत मालिनी
~ आधार आश्रम ~

सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया ।सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दुख भागभवेत ।।
अर्थात सगळे सुखी-समाधानी होऊ देत. सगळ्यांना निरोगी आणि निरामय आयुष्य लाभू देत. सगळ्यांना आनंदी-मंगलमय क्षणांचा अनुभव मिळू दे. कोणाच्याही वाट्याला कणभर देखील दुःख येऊ नये...

अर्थात हा एक सुंदर सकारात्मक विचार असून प्रत्यक्षात असे घडावे, असे आपल्यापैकी प्रत्येकाला वाटणे सहाजिकच आहे... पण प्रत्यक्षात मात्र असे घडताना दिसत नाही. आपल्या आजूबाजूला जर डोळसपणे पाहिले तर आपला अनुभव काही वेगळाच असतो. अनेकदा आपल्याला स्वत:ला वाईट-नकारात्मक अनुभव येतात, किंवा आपण अशा बातम्या वाचतो की आपण हादरतो, कोसळतो, अस्वस्थ होतो... आपला माणुसकीवरचा, चांगुलपणावरचा, सत्यावरचा विश्वास उडतो. अज्ञान, अन्याय, अत्याचार, भेदाभेद, विषमता, मोर्चे, दंगली, हिंसा, जाळपोळ, अपघात, दुर्घटना, पूर, दुष्काळ, प्रदूषण, आजार, दु:ख, वेदना, एकाकीपणा, भुकबळी, चोरी, लूटमार, फसवणूक, घोटाळे, बेकारी... काही मानवनिर्मीत तर काही निसर्गनिर्मीत घटनांची अशी ही अमर्याद यादी... मन विषन्न करणारी...

अर्थात आयुष्य इतकंही वाईट नाही ह्याची पदोपदी जाणीव करून देणाऱ्या व्यक्ती-संस्था-प्रसंग-घटना-स्थळांची संख्या देखील ह्या जगात हजारपट असेल यात शंकाच नाही... आयुष्य हा ऊन आणि सावलीचा खेळ आहे. आयुष्य प्रचंड क्षणभंगुर आणि अद्भुत-अनिश्चित गोष्टींनी भरलेले आहे. चांगल्या-वाईट गोष्टींची सरमिसळ म्हणजे हे आयुष्य...!

जग आणि जगणे खुप सुंदर, आशादायी व कलात्मक आहे... फक्त आपली दृष्टी आणि कार्य सुंदर, निर्मळ व सकारात्मक हवे... 

नि:स्वार्थ प्रेम, दया, आपुलकी, परोपकार, चांगुलपणा, समता, बंधुता, मानवता ह्या व इतर अनेक सद्गुणांच्या माध्यमातुन समाजातले, आपल्याच जवळपासचे, सामाजिक बांधिलकी मानणारे, माणूसकीवर दृढ विश्वास असलेले आपल्यापैकीच असे अनेक सामान्य लोक कळत-नकळत स्वत:साठी व इतरांसाठी हे आयुष्य सुंदर, आनंदी व सुगंधी करण्याचा सतत प्रयत्न करत आहेत... ह्या अनेक सामान्यापैकी एक असामान्य म्हणजे आयु. किशोर वसंत मालिनी माने...

आपण करत असलेल्या सेवेमुळे जगातले सगळेच दु:ख नाहीसे होत नाही... होणारही नाही... याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. पण एखाद्या जखमेवर प्रेमळ भावनेतून एक हळुवार फुंकर मारल्याने ती जखम सुसह्य व्हायला आणि लवकरात लवकर भरून यायला नक्कीच मदत होईल. या निरपेक्ष, निर्मळ, नि:स्वार्थ भावनेतून केलेल्या सत्कार्याच्या माध्यमातून दोन्ही बाजूला मिळणारे समाधान आणि आनंद अनमोल आहे. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या, आयुष्यात अनेक चांगले वाईट चढउतार आणि स्थित्यंतर जवळून अनुभवलेल्या किशोरजींनी आपले मित्र, नातेवाईक आणि हितचिंतकांच्या सहकार्याने एक सुंदर स्वप्न पाहिले आहे... एक सकारात्मक चित्र रंगविले आहे... 

आपल्या प्रिय पालकांच्या व आदर्शस्थानी असलेल्या इतर थोर समाजसेवकांच्या प्रेरणेतून त्यांनी ‘वसंत मालिनी आधार आश्रम’ ह्या सामाजिक संस्थेची स्थापना केली आहे. वसंत आणि मालिनी... किशोरजींवर प्रेम, दया, ममता, समता, सर्वधर्मसमभाव, माणूसकीचे संस्कार करणारे आणि दिनदुबळ्या, अनाथ, निराधार लोकांच्या सेवेची शिकवण देणारे त्यांचे प्रेमळ पालक. 

वसंत म्हणजे चैतन्य ऋतू, सुगंध व आनंदाचा बहर आणि मालिनी म्हणजे वेल, उत्स्फूर्त तारुण्य, टवटवीत ताजेपणा... अर्थात संस्थेच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती आपले दु:ख वेदना विसरून ह्या आनंद डोहात प्रफूल्लित आणि समाधानी होईल यात शंकाच नाही. या संस्थेच्या माध्यमातून नि:स्वार्थी भावनेने आपले आयुष्य समाज परिवर्तनासाठी झोकून देण्याचे संस्थेच्या सर्वच सदस्यांनी ठरविले आहे. आपले ध्येय-स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी संस्था अनेक कल्पक, परिणामकारक योजना आणि प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करत आहेत.

bottom of page